महालक्ष्मी मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..
कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाव्दार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .
देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.
शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.
नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या