श्रीशिवलीलामृत हा चौदा अध्यायांचा, २४५३ ओव्यांचा ग्रंथ स्कंदपुराणातिल ब्राम्होत्तर खंडाच्या आधारे रचला आहे. हा ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्ध संतकवी श्री प.प श्रीधरस्वामी यांनी इ. स. १७१८ मध्ये बारामती (महाराष्ट्र) येथे रचला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्रीधर नारायणशास्त्री नाझरेकर असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नाझरे या गावी इ. स. १६५८ साली झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते पंढरपुरातच स्तायिक झाले होते. तेथे राहून पुराण-प्रवचने व कीर्तने करून भक्तिमार्गाचा प्रसार करू लागले. त्यांची रसाळ कीर्तने ऐकण्यासाठी लोकांची गर्दी लोटू लागली. साहजिकच जे आपण कीर्तन-प्रवचनातून सांगतो, ते ग्रंथबद्ध केल्यास भाविक जनांना त्याचा अधिक लाभ होईल, असा विचार करून त्यांनी पुराणकथा मराठी भाषेत ओविछन्दात लिहिण्यास प्रारंभ केला. त्यांचा पहिला ओवीबद्द ग्रंथ 'हरिविजय' हा होय. आकाराने लहान असलेला श्रीशिवलीलामृत हा त्यांचा शेवटचा सहावा ग्रंथ होय.
श्रीधरस्वामी भगवदभक्त संत होते. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर असली, तरी साधी व प्रासादिक आहे. त्यांची वर्णनशैली ओघवती, चित्रदर्शी असल्याने वाचकांचे चित्त ग्रंथातील विषयात गुंतवून ठेवते. त्यांच्या काव्यात भक्तिरस प्रधान असून त्याचा परिपोष करणारे वीर-करुनादी रस हि प्रभावशाली आहेत. त्याचबरोबर धर्मशास्त्र, अध्यात्म, सांख्य इत्यादी शास्त्रांची ओळखही ते वाचकांना करून देतात.
अशा या प्रासादिक ग्रंथाचे हे वाचन आहे.