भगवान श्रीदत्तात्रेयांसारख्या जगत्कल्याणास्तव सगुण व साकार झालेल्या परतत्त्वाच्या माहात्म्याचा विषय व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांसारखे सिद्ध पुरुष हे ग्रंथकार, असा प्रस्तुत ग्रंथाच्या संबंधात आलेला योग श्रीमद्भागवतासारखाच अलौकिक आहे. सांस्कृतिक मूल्यांचा वर्तमान युगांतील दीपस्तंभ म्हणून प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींचे स्थान अनन्यसामान्य आहे. "ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षित: स्याद्वैदिको धर्म:" असे भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यांत म्हटले आहे. श्रीमदाचार्यांना जे ब्राह्मण्य अभिप्रेत आहे ते श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या रूपाने साकारले होते. चारही आश्रमांच्या आचारधर्माचे यथार्थदर्शन ज्यांच्या जीवनग्रंथातून घडते असा दुसरा कोणता महापुरुष वर्तमान युगात दाखविता येईल? कडकडीत तपाचरणामुळे ब्राह्मणाचे सारे सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट झालेले होते.
श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या जीवनातून हे सर्व विशेष प्रगट झालेले होते. स्वत:च्या जीवनातून त्यांनी जसे धर्माचे व आध्यात्मिक ध्येयवादाचे स्वरूप प्रगट केले, त्याचप्रमाणे अनेक जीवांचे "आर्त" दूर करून त्यांना सन्मार्गाला लावले व कृतार्थ केले. भावी पिढ्यांसाठी त्यांनी साहित्य निर्माण करून पारमार्थिक क्षेत्रांतील साधकांची सदाची सोय करून ठेवली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्रीमहाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वत:च प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात :-
"जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरी धरी अवतार । त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणी ॥
तत्सारभूत दत्तपुराण । औट सहस्त्र निरूपण । ते अपरिचित गीर्वाण भाषण । प्राकृतजन नेणती ॥
म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ । भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभहर्ता जो ॥
श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग । त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्र्वरानुराग दावी जो ॥
जेथे कार्तवीर्याचे आख्यान । अलर्काचे विज्ञान । आयुयदूंचे उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वे ॥"
श्रीदत्तमाहात्म्याची सप्ताहपद्धती :-
पहिल्या दिवशीं ६ अध्यायापर्यंत
दुसऱ्या दिवशीं १४ अध्यायापर्यंत
तिसऱ्या दिवशीं २२ अध्यायापर्यंत
चौथ्या दिवशीं ३० अध्यायापर्यंत
पाचव्या दिवशीं ३८ अध्यायापर्यंत
सहाव्या दिवशीं ४६ अध्यायापर्यंत
सातव्या दिवशीं ५१ अध्यायापर्यंत
या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात.
Ref : http://www.dattamaharaj.com