Sant Eknath Gatha | संत एकनाथ गाथा :
श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी मुख्यत: ईश्वर नामसंकीर्तनासाठी, प्रार्थनेसाठी, आळवणीसाठी अभंगांची रचना केल्याचे दिसते परंतु नाथमहाराजांनी ह्या माध्यमाचा वापर एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता समाज प्रबोधनासाठी, रंजनातून भजनाकडे नेण्यासाठी केल्याचे जाणवते. अनेक विषयांच्या माध्यमातुन केलेल्या उपदेशामुळे त्यांच्या अभंग गाथेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. बाळ क्रीडेचे अभंग, गोप-गोपींचे खेळ, कॄष्णचरित्र, राम चरित्र, पंढरीमहात्म्य, विठ्ठल महात्म्य, शिवमहात्म्य, दत्तमहात्म्य, नाम महिमा, किर्तन महिमा, चिंतन महिमा, संत महिमा, सद्गुरु महिमा, भक्तवत्सलता, पौराणिक कथानके, संतचरित्रे, हरिहर एकता, भगवत् रुपगुण वर्णन, अव्दैत, नीती, हिंदु-तुर्क संवाद, कलिप्रभाव, आत्मस्थितीपर अंभग, मुमुक्षुस उपदेश, मनास उपदेश, गौळणी आणि भारुड इ.च्या माध्यमातुन नाथांचे वाङ्मय प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीपर्यन्त पोचले. आपल्या अंभगाच्याच माध्यमातुन त्यांनी वारकरी संप्रदायात, भक्तसंप्रदायास "रामकॄष्ण हरि" मंत्राचा उपदेश केला. रामकॄष्ण हरि मंत्र हा सोपा । उच्चारिता खेपा खंडे कर्म ॥ अ.क्र.१८७ किंवा एकाजनार्दनी वक्त्रे । म्हणा रामकॄष्ण हरि ॥ माणसानं संसारात कसं असावं हे सांगताना नाथ लिहीतात - पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥ तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥ अशा प्रकारे आपल्या अनेक अभंगांच्या द्वारा नाथांनी पारमार्थिकास व सांसारिकास उपदेश केल्याचे दिसते. एकनाथांच्या वाङ्मयाचं वेगळेपण म्हणजे त्यानी आपल्या वाङ्मयात "एकनाथ म्हणे किंवा म्हणे एकनाथ" अशा प्रकारचा उल्लेख सहसा कुठेही केलेला आढळत नाही. त्यांनी वापरलेल्या नाममुद्रा ह्या त्यांचे सद्गुरु श्रीजनार्दन स्वामींच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत. जसे कि, एकाजनार्दनी, जनार्दनाचा एका, एकाजनार्दना शरण, शरण एकाजनार्दन, इ.इ. यावरुन नाथांची सद्गुरुंवरील उत्कट भक्ती प्रतीत होते.