Sant Janabai | संत जनाबाई
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.