ॲग्रोवन मका लागवड
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से.पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. मक्याची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात करता येते. खरीप हंगामात मान्सूनच्या संभाव्य आगमनानुसार मक्याची पेरणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणी मान्सूनपुर्वी 10-15 दिवस आधी केल्यास अधिक उत्पन्न मिळते. खरीप हंगामात उपपर्वतीय विभागातील जमिनीमध्ये अधिक उत्पादनासाठी जिरायतीखाली मक्याची पेरणी जून ते जुलै महिन्याचा दुसरा आठवड्यापर्यंत करावी. खरीपातील पेरणीस उशीर झाल्यास खोड किडींचा प्रार्दुभाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य न राहिल्याने उत्पन्न घटते.
.लागवड पद्धत ः
उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. सरी - वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी.
बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया
एक हेक्टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
खतमात्रा
मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते, त्यामुळे यास "खादाड पीक' म्हटले जाते. अधिक उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा.
मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो. म्हणून नत्र खतमात्रा विभागून द्यावी; परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणी वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात नत्र खताची मात्रा (युरिया) मका ओळीपासून १०-१२ सें.मी. दूर अंतरावर द्यावी.
पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः
अ) पक्षी राखण ः खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण पाच ते सहा दिवसांत होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशा वेळी देखील पीक राखण आवश्यक असते.
ब) विरळणी मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.