तांदूळ लागवड तांदूळ लागवड करण्यापूर्वी
तांदूळ लागवड करण्यापूर्वी
सन २०१६-१७ च्या आकडेवारीनूसार भात पिकाखालील क्षेत्र व उत्पादन खालीलप्रमाणे आहे.
जमीन व हवामान
उष्ण व दमट हवामान या पिकास पोषक आहे. जमिनीचा सामू ५ ते ८ या दरम्यान असावा. पर्जन्यमान ८०० मिलीमिटरहून अधिक असावे. पिकाच्या वाढीसाठी २५ ते ३५ सें.ग्रे. तापमान व ६५ ते ७० टक्केपेक्षा जास्त आर्द्रता पोषक असते. हलक्या ते मध्यम जमिनीबरोबरच खार जमिनीत देखील भाताचे पीक घेतले जाते.
लागवड पद्धती
ज्या ठिकाणी १००० मि.मि. पेक्षा जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो.
पेरणी पद्धत
अपारंपरिक विभाग, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी मध्यम ते भारी जमिनी दिसून येतात त्याठिकाणी पाभर किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली जाते.
टोकण पद्धत
१००० मि.मि. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेश व मध्यम जमिनी असलेल्या भागात टोकण पध्दतीने लागवड केली जाते.
सुधारित वाण
हळवा वाण
निमगरवा वाण
गरवा वाण
सुवासिक वाण
खार जमिनीसाठी सुधारीत वाण
पेर भातासाठी सुधारीत वाण
संकरित वाण
बियाण्याची निवड व रोपवाटिका व्यवस्थापन बीजप्रक्रिया
सुधारित/संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषि विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. लावणी पद्धतीसाठी हेक्टरी ३० ते ४० किलो, पेरणी पद्धतीसाठी ७५ ते १०० किलो व टोकण पद्धतीसाठी ५० ते ६० किलो बियाणे वापरावे. संकरित जातींकरिता हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे थायरम चोळावे. खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते १५ जूनपर्यंत गादी वाफ्यावर करावी. पेरणीकरीता १ मी. रुंदीचे, १५ सें.मी. उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे करावेत. एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावरील रोपवाटीका पुरेशी होते. वाफे तयार करताना १ गुंठा क्षेत्रास २५० किलो शेणखत किंवा कंपोष्ट खत आणि १ किलो युरिया खत चांगल्या प्रकारे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसानी प्रतिगुंठा ५०० ग्रॅम नत्र द्यावे. टोकण पद्धतीत हळव्या जाती १५ x १५ सें.मी. आणि गरव्या व निमगरव्या जाती २० x १५ सें.मी. टाकाव्यात. पेरणी पद्धतीत २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.पुर्नलागवड
रोपांच्या पुर्नलागणीपूर्वी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने चिखलणी करावी. हळव्या जातींची पुनर्लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी.एका चुडात २ ते ३ रोपे ठेवावीत. संकरित जातींसाठी एका चुडात १ ते २ रोपेच ठेवावीत. योग्य वयाच्या रोपांची पुर्नलागवड हळव्या वाणांमध्ये १५ ४ १५ सेमी, निमगरव्या, गरव्या आणि संकरीत वाणांमध्ये २०४१५ सें.मी. वर करावी.
खत व्यवस्थापन
अ) रासायनिक खतांचा वापर :
भात लागवडीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्यावेळी ५०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि ५०% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी; तर निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्यावेळी ४०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश, ४०% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि २०% नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी. संकरित जातींकरिता हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा लागणीच्यावेळी ५०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश, २५% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५% नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी.
ब) चार सूत्री भातशेतीचा अवलंब :
१) भात पिकाच्या अवशेषांचा (भाताच्या तुसाची राख ०.५ ते १.० किलो प्रति चौरस मीटर रोपवाटिकेमध्ये व भाताचा पेंढा २ टन प्रति हेक्टर पहिल्या नांगरटी वेळी) फेरवापर करावा.
२) गिरीपुष्पाचा पाला ३ टन प्रति हेक्टर चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा.
३) भाताच्या सुधारित जातींच्या रोपांची नियंत्रित लावण जोडओळ पद्धतीने (लावणीचे अंतर १५-२५ X १५-२५ सें.मी.).
४) युरिया-डीएपी (६०:४०) प्रमाणात ब्रिकेट्सचा वापर (१७० किलो प्रति हेक्टर).